प्रथम ब्रिटिशांच्या ताब्यात असलेले बॉम्बे (तत्कालीन नांव) १६६१ मध्ये इंग्लंडचे राजे चार्ल्स दुसरा यांना पोर्तुगीज राणी इंन्फंटा कॅथरीन डी ब्रॅगांजा हिच्यासोबत विवाह झाल्याबद्दल आंदण म्हणून देण्यात आले होते. योगायोगाने, देशाच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य चळवळीचा जन्म होण्याकरीता त्याचप्रमाणे या चळवळीतील काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना जसे की १९४२ मध्ये गांधीजींनी ब्रिटिशांना ‘भारत छोडो’ म्हणून दिलेला नारा, या सर्वांसाठी मुंबईने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जन्मदेखील मुंबईतच झाला. देशाच्या राजकीय स्वातंत्र्याच्या संघर्षाचे नेतृत्व या शहराने केले आणि अप्रत्यक्षपणे ब्रिटिश राजवटीच्या अस्ताला प्रारंभ झाला.
महाराष्ट्र अधिनियम, १९९६ च्या कलम पंचवीस अंतर्गत, महानगरपालिकेचा दिनांक १२ ऑगस्ट १९९६ चा ठराव क्रमांक ५१२ अन्वये ‘बॉम्बे’ चे ‘मुंबई’ असे नामकरण करण्यात आले. ब्रिटिश राजवटीच्या उदय आणि अस्त दरम्यानच्या कालावधीमध्ये या शहराने टप्प्याटप्प्याने विकसित होत नगर, शहर आणि जागतिक कीर्तीचे महानगर म्हणून नावलौकिक संपादन केला आहे.
जनगणना २०११ नुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्र ४८०.२४ चौरस किलोमीटर इतके असून १,२४,४२,३७३ इतकी लोकसंख्या या महानगरामध्ये सामावलेली आहे. भारताचा एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार, सरकारी महसूल यामध्ये या महानगराचा मोठा वाटा असून शिक्षण, वैज्ञानिक व तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रगतिमध्ये हे आघाडीचे केंद्र बनले आहे. ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली स्थानिक स्वराज्य पद्धतीचा विकास लवकर होण्याकरीता मुंबईच्या सर्वंकष वृद्धीनेदेखील योगदान दिले, ही समर्पक बाब आहे.
बृ.मुं.म.न.पा.चे अध्यक्ष आणि महापौरांची यादी.
ऐतिहासिक महत्वाची घटना
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६